पुणे: पुणे जिल्ह्यातील इंदापूरजवळ पिंपळे इथं भिगवण-बारामती राज्य मार्गावर रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांनी अचानक पेट घेतला आणि ट्रॅक्टर ट्रकखाली शिरल्याने त्याचे दोन तुकडे झाले. या अपघातात ट्रॅक्टर चालक आगीत होरपळून ठार झाला आहे. ट्रकचालक मात्र घटनास्थळावरून पळून गेल्याचे नागरिकांनी सांगितले. या आगीमुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातामुळे दोन तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी झाली होती. भिगवण पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, भिगवणकडे जाणारा ट्रॅक्टर आणि बारामतीच्या दिशेने येणारा ऊस वाहतूक करणारा ट्रक यांच्यात हा भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की ट्रॅक्टर ट्रकखाली पूर्णपणे शिरला. यामुळे ट्रॅक्टरचे दोन भाग झाले. दुर्दैवाने, ट्रॅक्टर चालक वाहनातच अडकला होता. अपघाताच्या धक्क्याने ट्रकही उलटला. या भीषण अपघातानंतर दोन्ही वाहनांनी अचानक पेट घेतला आणि आगीच्या भयंकर ज्वाळांनी रौद्ररूप धारण केले.
या आगीत ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टरमध्ये अडकल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तो जागीच जळून खाक झाला. परंतु, ट्रकचालक घटनास्थळी आढळून आला नाही. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर ट्रकचालक बचावासाठी तिथून पळून गेला. या संपूर्ण घटनेत दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून ट्रक आणि ट्रॅक्टरसह चालकही या आगीत जळून खाक झाला. ट्रकच्या दोन्ही बाजूंना लागलेल्या आगीमुळे ट्रकचंही मोठे नुकसान झालं.
दरम्यान, या अपघातामुळे भिगवण-बारामती रोडवर दोन तासांहून अधिक काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. भिगवण पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी, ट्रॅक्टर चालकाचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबाबत भिगवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.